थंड हवेचे ठिकाण माथेरान
माथेरान म्हणजे निसर्गाच्या सौंदर्याचा अलौकिक ठेवा. माथेरान
हे रायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे.मुंबईपासून सर्वात जवळ असलेले
आणि सहजपणे जाता येणारे थंड हवेचे ठिकाण म्हणजे माथेरान. सह्याद्रीच्या डोंगररांगात
असलेले हे छोटेखानी गाव इंग्रजांच्या काळातील बंगल्यांनी नटलेले आहे. सह्याद्रीच्या
मुख्य रांगेपासून जराशी वेगळी झालेली ही डोंगर रांग आहे. समुद्रसपाटीपासून साधारण ८०३
मी. म्हणजेच २६०० फूट उंचीच्या शिखरावर माथेरान आहे.
पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी येथे वाहनबंदी आहे. येथील
खास वैशिष्टय असणारी रेल्वे पाहून अगदी गाण्यातल्या झुकझुक आगानगाडीची आठवण होते. वाफेच्या
इंजिनावर चालणारी ही गाडी माथेरानला नेता नेता आजूबाजूच्या मनोहारी निसर्गाचे दर्शन
घडविते. ही रेल्वे जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आली आहे. दार्जिलिंगच्या हिरव्यागार
पर्वतराजीतून जाणार्या हिमालयीन रेल्वेचा अनुभव ही रेल्वे पर्यटकांना देते. झुकझुक
चालणार्या या रेल्वेतून प्रवास करण्याचा आनंद अवर्णनीय.
ब्रिटिशांनी मुंबईजवळची जागा माथेरान ही थंड हवेचे ठिकाण म्हणून मुद्दाम विकसित केली. इ. स. १८५० मध्ये मुंबईचा गव्हर्नर लॉर्ड एलफिन्स्टन व ठाण्याचा कलेक्टर ह्यूज मॅलेट यांनी माथेरान शोधले. मुंबई गव्हर्नरने १८५४ मध्ये माथेरानवर बंगला बांधला. माथेरान शोधले म्हणजे येथे आधी वस्ती होतीच. माथ्यावरील दाट वनश्रीमुळे याला ‘माथेरान’ हे नाव पडले. असेही म्हणतात की, धनगरांचे मातापिता याच जंगलात मरण पावल्याने या जंगलात ‘मातेचे रान’ (माथेरान) आहे. येथील निसर्ग पाहून सर आदमजी पीरमॉय यांनी प्रथम नेरळ ते माथेरान अशी पाऊलवाट तयार केली. नेरळ-माथेरान लोहमार्ग बांधण्यासाठी त्यांचा दुसरा मुलगा अब्दुल हुसेन यांनी प्रयत्न केले. एवढ्याश्या छोट्या माथेरानवर १९०५ साली नगरपालिकेची स्थापना झाली.
इंग्रजांनी माथेरान वसवले त्यामुळे बहुतेक पार्इंटसला त्यांनी इंग्रजीच नावे दिली व ती आजही तशीच आहे. पॅनोरमा, गार्बट, अलेक्झांडर, हार्ट, लिटल चौक, ग्रेट चौक, वन ट्री हिल, डेंजर, एको, लँडस्केप, लुईसा, पॉक्युर्पाइन, मंकी, आर्टिस्ट, स्फिंक्स, बार्टल आदी पार्इंटस पाहण्यासारखे आहेत. संपूर्ण माथेरानचा परिसर हा विपुल वृक्षांनी सजलेले आहे.

Comments
Post a Comment