स्वाद महाराष्ट्राचा मराठमोळ्या मातीचा
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात जसं वेगळपण आहे तसंच ते इथल्या खाद्यसंस्कृतीतही दिसून येतं. ‘जिथे जे पिकतं तिथे तेच शिजतं’ असं म्हणलं जातं ते अगदी खरंय. देशभरात कुठेही जा. काही निवडकच पदार्थ ताटात दिसतात. उत्तरेकडे गेलात तर गव्हापासून बनवलेल्या रोटी आणि भाजीचे विविध प्रकार अधिक असतात. तिथे भाताचं प्रमाण कमी. तर दक्षिणेकडच्या राज्यात गेलात तर याउलट चित्र दिसतं. पण महाराष्ट्र या देशात चित्र खूपच वेगळं आहे. एक संपूर्ण आहार इथल्या घराघरातल्या ताटात दिसतो. दर दोन मैलांवर बोलीभाषेचं एक वेगळं रूप बघायला मिळतं तशी खाद्यसंस्कृतीतील विविधताही दिसून येते. प्रांतांप्रमाणे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ खायला मिळतात.
विदर्भाची सुपीक काळीशार माती आणि भाज्या, फळं यांची विविधता यामुळे इथली खाद्यसंस्कृती मुलत शाकाहारी म्हणावी अशी आहे. मसालेदार तिखट भाज्या, घट्ट वरण, चटण्या कोशिंबीरीचे पानातून ओसंडून वाहतात की काय अशी शंका यावी इतके प्रकार, लोणची, पापड आणि हो ! वडे, भजे, बोंड यांचे अनेक प्रकार इथेच चाखायला मिळतात. पुरणाची पोळी महाराष्ट्रभर केली आणि खाली जाते पण विदर्भातली पुरणपोळी गच्च पुरणभरलेली मऊसुत असते. आवरण अगदी पातळ आणि गृहीणींचे कसब हे की अशा पुरणपोळीतून कुठेही पुरण इकडून तिकडून बाहेर डोकावत नाही. आंबट, तिखट, गोड, या टोकाच्या चवी वैदर्भीय खाद्यसंस्कृतीत गुण्या गोविंदाने नांदतात.
याउलट कोकणी खाद्यसंस्कृती आहे. कोकण, निसर्गरम्य कोकणात उपलब्ध साधनसामग्री म्हणजे तांदुळ, नारळ, फणस, आंबे, काजू आणि रम्य समुद्रकिनार्यामुळे लाभलेली सिकुडची संपन्नता या सार्यांचा मिलाफ कोकणी खाद्य संस्कृतीत झाला आहे.
मराठवाडय़ाची संस्कृती ही थोडीफार चमचमीत म्हणावी अशीच. या मराठवाडा तेलबियांच्या बाबतील समृद्ध, तीळ, शेंगदाणा, जवस, कन्हाळ. यांचा भरपूर वापर इथल्या स्वयंपाकात करतात. चटण्या हा मराठवाडय़ाच्या खाद्यसंस्कृती चा अविभाज्य भाग. चारीठाव म्हणावी अशी ही खाद्यसंस्कृती. वरण, भात, भाजी पोळी, चटणी असे चारीठाव जेवण मराठवाडय़ात केले जाते. पुरणपोळीबरोबर मुटका मारायला कटाची आमटी हे इथले वैशिष्ट्य. आमरस, कुरडय़ा, पापडय़ा, याबरोबरच पाकपुर्या, जिलबी, बुंदी, सुधारस, गव्हाची खीर आणि फराळाचे असंख्य पदार्थ चकली, शंकरपाळ्या सोबत केले जातात.

Comments
Post a Comment